रविवार 10 जुलै 2011

फेसबुक बाबा

फेसबुक-बाबांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यावर लिहायचं म्हंटलं तर हजारो पानं खर्च होतील. फेसबुकचा दांडगा अभ्यास केला असल्यामुळे फेसबुकावरची काहीही समस्या असो, यांच्याकडे इलाज आहे! आजकाल त्यांनी फेसबुक साफ ठेवण्याचा वसा घेतलाय, आणि जोडीला कन्सल्टिंग करतात (मंगळवारी फुकट).

मला त्यांनी "चरित्र लिहायला घे" असा आदेशच दिला परवा. पण एवढा वेळ कोणाला आहे! आणि असला तरी तो अत्मोद्धारासाठी खर्च करायचा का ह्यांचं चरित्र लिहीण्यासाठी? पण, बाबाजीचा आदेश असा एकदम कसा धुडकावून लावणार? मग मीच विनंती केली - "संक्षिप्त स्वरूपात काहीतरी लिहीतो". म्हंटलं, "आजकाल लोकांना देवनागरी धड वाचता येत नाही, आणि मला इंग्रजी लिहीता येत नाही". त्यांनाही ते पटलं म्हणून बरं झालं.

म्हंटलं, "तुमच्याविषयी लिहीण्यापेक्षा तुमचा उपदेश लिहीतो. लोकांना उपयोगी तरी पडेल!"
ते तसे समंजस आहेत. लगेच "ठीक आहे" असं म्हणाले :)

त्यांनी सांगितलं "एकदम एका मागून एक उपदेश नको, थोडी बॅकग्राउंड समजावून सांग माझ्या प्रत्येक वचनाबद्दल". म्हणून हा सगळा प्रपंच. नाहीतर तसा मी डायरेक्ट मुद्द्याकडे येणारा माणूस आहे you know!

तर, यांच्या दरबारी फेसबूक युजर आपापली गाऱ्हाणी घेऊन येतात. ती गाऱ्हाणी ऐकून बाबा त्यावर उपदेश करतात आणि तो टाईप करून त्यांच्या ’पेज’ वर पोस्ट करतात. शक्यतो काव्य रूपात. मग हे मटेरियल त्यांना पुढच्या प्रवचनात उपयोगी पडतं. आता, लोक त्याच त्याच चूका परत परत करतात हे मला ठाऊक आहे. त्यामुळे फेसबूकबाबा कितीही बडबडत बसले तरी कंटेंट साधारण तेच असतं. पण बाकीच्या लोकांना वाटतं की काय गहन विचार मांडतायत! चालायचंच! म्हणून तर यांचा धंदा तेजीत आहे अजून. मी विचार केला, त्यांचं प्रवचन साधारण कसं असतं त्याबद्दलच लिहूया, म्हणजे फार कष्ट पडणार नाहीत. म्हणलं सगळं १-२ पानात उरकुन टाकू. असो.

यांच्या प्रत्येक प्रवचनाची सुरूवात प्रतिज्ञेने होते. त्यांच्या मते ही प्रतिज्ञा इतकी पॉवरबाज आहे की ती फेसबूकवरील ८० % समस्या दूर करेल असा त्यांचा दावा आहे. सूत्र सोपं आहे:

मित्र पोस्ट करो, वा नातेवाईक ।
लगेच लाईक, करू नये ॥


लाईक करण्यासाठी काहीतरी हवं म्हणून अपडेट्स. काही गरजेच्या, बऱ्याच बळच. फुकट बाईट्स चा अपव्यय. काही अपडेट्स मात्र स्पेशल असतात. भक्तांची उत्सुकता ताणणाऱ्या. ३०/४०/५० - डजन्ट मॅटर! कितीही वय असो. नुसत्या अल्बम कवर्स च्या अपडेट्स पाहूनही 'कुतुहल' जागृत होतं.

पण बऱ्याचदा अल्बम कवर्स मृगजळासारखी असतात,

पाहून सुमुख, जावे आत तर ।
फोटोत पंटर, उभा असे ॥


तर कधी त्या प्रोफाईल मधली व्यक्ती ऑलरेडी विवाहीत असते:

सुंदर ललना, कुतुहल कोण ।
पण तीला दोन, आडनावे ॥


७०० मिलियन युजर्स गोळा करून ठेवलेत म्हणे फेसबुक वाल्यांनी. पण फेसबुक-बाबांनी त्यांचं वर्गीकरण निव्वळ दोन गटात केलंय. मॅच्यूअर आणि इम्मॅच्यूअर. पहिल्या वर्गास दुसऱ्या वर्गाकडून प्रचंड त्रास होतो. स्टेटस आणि फोटोतील टॅगिंगचा लक्ष वेधून घेण्यासाठी सर्रास गैरवापर होतो. त्यावर ते म्हणतात:

अनीता-सुनीता, इतर जनता ।
एका फोटोमध्ये, टॅग केली ॥


शिंत्रे काकुंनी इतके दिवस आपलं वय मोठ्या परिश्रमानं लपवून ठेवलं होतं. पण त्यांना प्रायवसी सेटींग्ज काही झेपेनात. मग काय? ५०-६० लोकांनी शुभेच्छा दिल्या पब्लिकली! हाउ एम्बरॅसिंग :) अहो, एका वयानंतर वाढदिवसाचं फार कुतुहल नसतं. आणि भींतीवर तो साजरा केल्याने त्या व्यक्तीला ’कट्यार काळजात घुसल्या’चा अनुभव येतो. यावर फेसबूक बाबा सांगतात:

बर्थडेचे विश, देण्या घरी जावं ।
भींतीकडे धाव, घेऊ नये ॥


स्पॅम काय कमी आहे इंटरनेटवर? प्रत्येकाला त्याविषयी थोडंतरी माहित आहेच. पण तरीही अगदी संगणकशास्त्र शिकलेले लोक देखील गळाला लागणाऱ्या माशाप्रमाणे सहज फसतात. यावर त्यांचं एक फेमस वचन आहे:

भुलून वरील, उत्तान चित्रास ।
लिंक ती मित्रास, धाडू नये ॥


संत्या परवा तक्रार घेऊन आला. एकजण स्वत:ची फार जाहिरात करून वैताग आणतोय म्हणून. म्हणे एक मोठा ग्रुप आहे. त्या ग्रुपचे लोक एकमेकांच्या पोस्ट लाइक करून, त्यावर कॉमेंट करून वर आणत असतात. फेसबुक बाबांनी त्वरीत नवी पोस्ट तयार केली:

वेगळे शिर्षक, तीच न्यूज आत ।
चीप जाहिरात, करू नये ॥

आणे वर पोस्ट, इतरांस त्रास ।
साक्ष उंदरास, मांजरसे ॥


पन्नास लाईक, बातमी फुसकी ।
किस्मत जि
सकी, चमके रे ॥


फेसबूकवर गेम खेळणारेही बरेच आहेत. बाकीचे लोक गेम हाईड करून थकले आता. पण हे लोक खेळूनही थकत नाहीत. Farmville च्या फॅन्सवर फेसबुक-बाबा लिहितात:

दिसेल तो गेम, मनावर घेती ।
सदा करी शेती, शेतकरी ॥


शेवटी प्रवचनं दिली किंवा कितीही ओरडून सांगितलं तरी लोक ऐकणार आहेत का? अहो एवढा ’फ्रेंड्स’ चा मॉब असल्यावर लोकांना चेव येणारच. काही लोक हापिसातुन थकून भागून आल्यावर विरंगुळा म्हणून इथे येतात. काही फेसबुकींग करून कंटाळल्यावर (आणि कंटाळले तर) ऑफिसात जातात, तर काही ऑफिसात फेसबुकींग करून थकतात. आता इथेही नियम पाळायचे म्हंटलं तर कोणी फिरकेल तरी का फेसबुककडे? फेसबुकबाबा हे जाणून आहेत. त्यामुळे ते व्रात्य फेसबुकर्सना शाप वगरे देत नाहीत. ते कितीही भारी असले तरी शेवटी त्यांना चित्रगुप्ताची भीती आहेच. त्याला कोण एक्स्प्लेन करत बसणार नंतर? उगाच कोणाचे मन दुखवले गेल्यामुळे पाप लागायला नको म्हणून ते प्रवचन लगेच उरकतं घेतात:

चूकल्यास काही, करा मज माफ ।
फेसबूक साफ, ठेवताना ॥






गमती जमती, आपणही पहा ।
मग खाली लिहा, प्रतिक्रिया ॥
- किशोर दातार


4 टिप्पणी(ण्या):

Onkar म्हणाले...

जोरात आहे !

Circuit म्हणाले...

Varun Tisara Shlok vachun dnyanat bhar padli....Dhanyavaad..!!

Circuit म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
राजे - राज जैन म्हणाले...

welcome back !!

mstach !