गुरुवार 9 सप्टेंबर 2010

गन्या फोटोग्राफर

न्या .. , ए गन्या, अरे त्या झेंडूच्या फुलात कसलं डोंबलाचं सौंदर्य पाहतोस लेका! मी वैतागुन म्हणून टाकलं. याच्याबरोबर कुठे जायचं म्हणजे हा ती तोफ बरोबर घेऊन येणार कायम! दहा दहा पावलावर याला कधी झेंडू, कधी दगडफुल तर कधी कॉंग्रेसच्या गवतात काहीतरी दिसणार. गाडीतली सामानाची निम्मी जागा याच्या ’त्रिपादा’नी व्यापलेली.

तुला नाय कळायचं लेका. गन्या झेंडूच्या फुलावरुन नजर न हटवता म्हणाला. झेंडूचं फुल हे फोटोग्राफीसाठी एकदम आयडीयल! पिवळा केशरी भडक कलर, त्यात पावसाळी हवा, थोडंसंच उन, एकदम परफेक्ट! परवाच नवीन मॅक्रो लेन्स घेतली. ९० एम एम. यातुन फोटो काढायचा म्हणजे क्सील पाहीजे. जरा पुढे मागे झाला कॅमेरा की ऑब्जेक्ट ब्लर होतं. तुला माहितीय का? ही अशीच लेन्स डिटेक्टीव पण वापरतात. गन्यानी वर पाहिल्यावर त्याला कळलं ... मी केव्हाच १५ पावलं पुढे निघून गेलो होतो.

गन्यानं मला गाठलं. "गाढवाला गुळाची ..." गन्या पुटपुटला. आम्ही या म्हणी वापरायला आताशाच सुरुवात केलीय :). शिव्यांपेक्षा कधी कधी जास्त सलतात. "ठीक आहे. मी गाढव. पण मग तु का हे तोफेचं आणि त्रिपादाचं ओझं वाहतोयस सगळीकडे?" गन्या आणि मी मुक्तपणे हसलो.

गन्या, तुझ्यात आणि गौतम राजाध्यक्षांमधे एकच फरक आहे, त्यांच्या कॅमेऱ्यासमोर असतात गुलाब आणि तुझ्या कॅमेऱ्यासमोर असतो झेंडू.

"ड्यूड, तुला आवडत नसतील मी काढलेले फोटो, पण माझं फेसबुक पहा. कळेल तुला किती फॅन आहेत माझे." गन्याला शांत झालेल्या वाघाला जागं करायची वाईट सवय आहे :P. मी म्हणलं, "तु साध्या कॅमेऱ्यातुन काढलेले दोन वर्षांपुर्वीची फोटो पहा. कसे फिकट आले आहेत." हा वाद आमच्यात दर ट्रीप ला होतो. वाद असला तरी मैत्रीपुर्ण असतो. त्यामुळे माझंही जरा फ्रस्ट्रेशन कमी होतं आणि उगाच गप्प बसुन पावलं टाकण्यापेक्षा जरा एन्टरटेनमेंट होते. विशेषत: ग्रुप मधे नवीन असलेल्या लोकांची.

माझ्या मते जेवढा कॅमेरा चांगला, तेवढे फोटो चांगले. गन्याचं मत असं की स्कील असल्याशिवाय फोटो चांगले येतंच नाहीत. ते जुने फोटो कमी ’मेगापिक्सेल’ च्या कॅमेऱ्यातुन काढले असल्यामुळे ब्लर झाले आहेत. "गन्या, मग तुझं ’स्किल’ वापरायचं होतस की" ... यावेळी गन्या १० पावलं पुढे गेलेला.

गन्या, माझा प्रॉब्लेम असा आहे, की मला कुठल्याही SLR कॅमेऱ्यातुन काढलेले फोटो चांगले वाटतात. तु काढ, संत्या काढू दे, किंवा पप्या काढू दे. गन्याचं टिपिकल उत्तर "तु अजाण बालक आहेस अजून".

"बरं, निदान फोटो प्रोसेस करुन, त्यावर इफेक्ट्स टाकून तरी फोटो दुरुस्त करु नयेत ’चांगल्या’ फोटोग्राफरनी". गन्यावर या वाक्याचा काहीही परिणाम होणार नव्हता. "आजकाल ना, SLR स्टेटस सिंबॉल झालाय. जो उठतो तो नवीन कॅमेरा घेउन येतो, लेकांनो ते एवढं ओझं कशाला घेउन यायचं हाइक ला येताना? उगाच लोकांना आणि झेंडुच्या फुलांना :) त्रास." माझ्या याही म्हणण्याकडे गन्यानी दुर्लक्ष केलं. "तुम्हा लोकांकडे SLR म्हणजे माकडाच्या हाती कोलीत".. मीपण एक म्हण वापरुन घेतली. वाद चालू असला की याचे फोटो जरा कमी होतात हे मी ओळखलं होतं ;) .

डोंगरदऱ्या, सुर्यास्त, वाहणारे ओढे, नद्या, निरभ्र आकाश, कधी ढगाळलेलं आकाश. हे सगळं पाहिलं की गन्या आनंदीत. त्यात नॅचरल लाईट परफेक्ट असला की त्याचा चेहेरा असा खुलतो की विचारू नका. वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस, कधी फिल्टर का काय म्हणतात ते, आणि कधी मला माहीतही नसलेली हत्यारं कॅमेऱ्याला जोडून गन्या जगाला आपल्या SD कार्डवर बंदिस्त करायचा प्रयत्न करत असतो. त्याला फोटो काढताना माझ्या म्हणी, लोकांची कुरबुर, काही काही ऐकू येत नाही. गन्या कधीतरी निसर्गाकडे साध्या डोळ्यांनी बघु शकेल का? नेहेमी माझ्या पुणेरी मनात शंकेची पाल चुकचुकते. ट्रीप झाल्यावर गन्या सगळे फोटो लॅपटॉप वर ट्रान्सफर करतो. मला विचारतो, "काय मास्तर, कसे वाटले फोटो?". मी माझं उत्तर राखून ठेवत असल्याचं सांगून त्याला आणखी डिवचतो.

आता मीही फोटोग्राफिविषयी चार गोष्टी शिकलोय. दोन SLR नी काढलेल्या फोटोंमधला फरक आता मला बऱ्यापैकी कळू लागलाय. फोटोमधील सिमेट्री, वस्तुंच्या रंगसंगती, त्यांची मांडणी अशा काही गोष्टी मलाही आता कळतात. भले कॉट्रास्ट, पर्स्पेक्टीव, टोन, कॉंपोझिशन, ब्लर, आस्पेक्ट रेशो असले जड शब्द मला माहीत नसतील. आपण काढलेले सगळे फोटो अपलोड करायचे नसतात हे मात्र मला वेगळं शिकावं लागलं नाही.

दुर्दैवानं माझ्यातला हा बदल पहायला गन्या आज या जगात नाही. कधीकधी कॅमेरा दिसला की डोळ्यासमोरून एखाद्या फिल्मप्रमाणे या आठवणी सरकतात. गन्याच्या फेसबुकवरचे अल्बम मी चाळले की लक्षात येतं एकाही फोटोत गन्या नसल्याचं... तो नेहेमी फोटोच्या मागे. "गन्या, तु काढलेले फोटो लै भारी आले आहेत" हे माझं खरं उत्तर ... अजूनही राखीवच ...






7 टिप्पणी(ण्या):

Avadhoot म्हणाले...

शिव्यांपेक्षा कधी कधी जास्त सलतात. :D
Kay re...ending ekdam PuLa style kelas :)

Audumbar म्हणाले...

ditto Avdhoot! मीही हेच म्हणणार होतो, एकदम पुलं सारखं लिहीतोयेस तू किशोर! मस्त वाटलं वाचायला!
तू नाही नाही म्हणत तुझंही photography विषयी बरंच ज्ञान आहे असं दिसतंय :)
बाकी photographers च्या बाबतीत नेहमी संमिश्र भावना असतात, ट्रीपच्या वेळी त्यांची थट्टा केली जाते अन नंतर मात्र त्यांना पूर्ण दाद मिळते, त्यांनी काढलेले photos च आठवणी जाग्या करतात!

Anubhav म्हणाले...

uttam zala aahe likhan

Varish म्हणाले...

उत्तम लेख !

सुहास झेले म्हणाले...

जबरदस्त लिखाण... खुप आवडलं !!

राजे - राज जैन म्हणाले...

मस्त लिहले आहे, शेवट मात्र.....

Vinayak Pandit म्हणाले...

छान लिहिलंय तुम्ही!आवडलं!