अबतक च्या कार्यालयात संदीप न घाबरता शिरला. फॉर्मल शर्ट, टाय, ट्राउसर आणि कोट यात तो
अगदी कंफर्टेबल फिल करत होता. त्याच्या चेहेऱ्यावरील आत्मविश्वास त्याच्या या धीटपणाची जणू साक्षच देत होता. न्यूज ऍंड मिडीया चा पदवीधारक असूनही संदीप एका संगणक प्रणाली तयार करणाऱ्या कंपनीत काम करत असे. बहुदा त्याला हे खटकत असावं. आपण जे शिकलो ते वाया गेल्याचंही त्याच्या मनात असेल कदाचित.
इतक्यात साक्षात प्रभूराम चंद्रा, अबतक चे प्रसिद्ध, अवॉर्ड विनिंग डायरेक्टर तेथे हजर झाले. नंतर कळलं की तेच आज संदीप चा इंटरव्यू घेणार होते. आता त्याची खरी परीक्षा होती. रिसेप्शनिस्ट ने सांगितल्या प्रमाणे संदीप रुम नं ३४२ जवळ आला. टाय नीट केल्यावर त्याने दारावर नॉक केलं. “मे आय कम ईन सर?”. म्हणताच, “येस. प्लीज कम ईन.” असा आतून आवाज आला. झाली एकदाची इंटरव्यूला सुरूवात.
“प्लीज मेक युवरसेल्फ कंफर्टेबल मिस्टर संदीप”.
“आय ऍम ऑल राईट सर.” संदीपने हातातली फाईल टेबलावर ठेवत उत्तर दिलं.
“तर संदीप, तुला संदीप असंच म्हणतो आतापासुन, चालेल ना?”
“तेच बरं वाटेल सर. नाहीतर उगाच वय झाल्यासारखं वाटतं.” संदीपने ’आईस’ ब्रेक केला.
“बरं. मुद्द्याकडेच वळू थेट. तुझं शिक्षण या क्षेत्राशी रिलेव्हंट असलं, तरी सध्या तु काम करतोयस वेगळ्याच प्रकारचं. मग तु या पोझिशन साठी का अर्ज केलास?”
“सर, मनाला कुठेतरी खटकत होतं. आणि या क्षेत्रात काम करायची पॅशन आहे. मला खात्री आहे मी दिलेल्या संधीचं सोनं करेन.”
“वे टू गो. हं… तर बेसिकपासूनच सुरु करूया. मला सांग की तुला चॅनलचा स्क्रीन लेआउट आणि टायटल व मधील म्युझिक डिझाइन करायला सांगितलं, तर कसं करशील?”
“सर, इफ यू डोंट माईंड, मी तुम्हाला न्यूज रिडींग पासून इन्वेस्टिगेशन पर्यंत सगळ्या गोष्टींबद्दल मला असलेली माहिती देऊ का?”
“दॅट विल बी ऑसम! मला प्रश्नच विचारायला नको.” प्रभूंनी हसत होकार दिला.
संदीप खुर्चीवरून जवळजवळ उसळलाच! “सर, अगदी सोपं आहे.” आणि पुढे सांगू लागला.
“बातम्या सुरु होताना जे म्युझिक असतं ना, त्यात तबल्याचा मॅक्सिमम आवाज पाहीजे. गिटार, व्हायोलिन, मेंडोलिन, पियानो अशी लोकांना माहीत असलेली वाद्य त्यात वापरू नयेत. हायवेवर मोठ्या मोठ्या ट्रकचा हॉर्न जसा वाजतो त्या आवाजशी साधर्म्य असलेलं वाद्य हवं. म्हणजे आधी हॉर्न – पॅ प प पॅ पॅ SSS पॅ प प पॅ पॅ SSSS मग तबला, धिट्ताक धिटताक…. आणि शेवटी एखादं मवाळ इन्स्ट्रुमेंट त त त तॅंव त तँव…” संदीप सारकॅस्टिकली सांगत होता. “काय आहे सर, सोसायटीतल्या जिन्यात सर्व घरातील टीव्ही ऐकू येतात. त्यात आपल्याच चॅनलचा आवाज उठून दिसायला हवा. त्या गोंगाटातही तो वेगळा ऐकू यायला हवा.”
प्रभूराम चंद्रा आश्चर्यचकीत झाले. पण नंतर त्यांनी विचार केला, की कदाचित विनोदनिर्मितीचा संदीप चा प्रयत्न असावा.
“मग एक सुटाबुटातील दाढी वाढलेला माणूस स्वागताला. देखतें है आजकी ताजा खबरे असं म्हणत त्याने २४ तास शिळ्या त्याच हेडलाईन परत द्यायच्या. हे करताना बेंबीच्या देठापासून ओरडणं फार महत्वाचं आहे. किमान २० चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या बातमीला एक्सक्लुजीव व ओनली ऑन अबतक असं डिक्लेअर करायचं.”
“स्क्रीन लेआउट तर फार महत्वाचं आहे. उजव्या कोपऱ्यात चॅनलचा प्रमाणाबाहेर मोठा असा लोगो हवा.
त्या खाली लाईव कवरेज च्या वेळी त्याहूनही बेढब दिसणारी LIVE अशी चार लेटर हवीत. खाली १/४ स्क्रीन व्यापेल अशा पट्टीत BREAKING NEWS एवढंच निम्म्याहून अधिक वेळ लिहावं. त्याच एरियात एका चान्समधे वाचता येउ नये म्हणून एक ब्रेकिंग न्यून ४ वाक्यात तोडून दाखवावी. त्या पट्टीखाली स्टॉकचे भाव. त्याखाली छोट्या जाहिराती, त्याखाली लोकांनी पाठवलेले SMS – ‘dhoni is winner captain’, ‘mahi you make us praud’, ‘salman should quit’, ‘congress is good than bjp’ - शक्यतो त्या SMS ला एडिट न करता चुकांसह दाखवावेत. मग ’पिंकी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा व नंतर सुभेच्छुकांची मोठी रांग, काका, दादू, पवन, रिंकी, सोनू वगरे… अणि रंगसंगती डोळ्यात भरायला हवी. थोडक्यात काय, तर प्रेक्षकाला शून्य किंमत. तो शुद्र. त्याच्या डोळ्याला जास्तीत जास्त त्रास व्हायला हवा.”
काहीतरी सिरियस प्रॉब्लेम आहे हे प्रभूंच्या लक्षात आलं. “मि. संदीप..” असं त्यांनी म्हणताच
“सर, लेट मी स्पीक.” संदीपने त्यांना थांबवलं. त्याचा आत्मविश्वास पाहून प्रभूंना पुढे बोलणं शक्य झालं नाही.
“बरं ब्रेकींग न्यूज म्हणजे काय? तर याला थंडी वाजली, त्याने रोटी खाल्ली, अमक्याचा कुत्रा हरवला, तमक्याला साधा ताप आला तरी लिलावती अस्पताल मे भरती. वर लोकांना त्याच्यासाठी SMS वरून शुभेच्छा द्यायला लावायच्या.”
“आठ आणि दहा वाजता तुमचे एक्सपर्ट बोलवायचे. त्यांनी लोकांच्या अंगावर ओरडून ओरडून कशालाही
सत्य म्हणून खपवायचं. साधं खंडग्रास ग्रहण झालं तरी पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली यावर लेक्चर. निवडणूकीच्या वेळी राजकीय पक्षातील लोक गोळा करायचे आणि LIVE मंडई भरवायची. बरं, त्यात एक सेन्सीबल माणूस आणायचा. एकच. त्याला फार बोलूच द्यायचं नाही. सगळ्यांनी मिळून त्यावर हल्ला करायचा आणि एक्सपर्टनेही त्यात सहभागी व्हायचं. कधीमधी एखाद्या भडक वेशातल्या ज्योतिष्याला बोलवून पत्ते कुटायला लावायचे. कुठच्यातरी कोपऱ्यातील गावातील ’शादीत’ न बोलवता जायचं आणि त्या अडाणी लोकांना काहीतरी बरळायला लावून तोच विषय २-२ दि
वस कुटायचा. परत सांगतो, या सर्व गोष्टींपेक्षा जोरजोरात आरडाओरडा करणं हा पत्रकारितेसाठी अत्यावश्यक गुण(?) आहे.”
“पत्रकार शक्य तेवढे उरमट असलेले बरे. ईंटरव्यू मधे अतिथीलाच बोलून द्यायचं नाही. बायस्ड तर ईंटरव्यूवरनी असलंच पाहीजे. नाहीतर खटके कसे उडणार? कुठेकुठे फोन लावायचे आणि संबंध नसलेल्या माणसाचं मत विचारायचं. आणि अती शहाणपणा पत्रकाराच्या अंगी असलाच पाहीजे.”
“हम अभी खुलासा करने वाले है। असं म्हणून तासंतास मुद्द्याला हात न घालता बातम्या रंगवत बसायच्या आणि शेवटी फुसका बार उडवायचा.”
“मी आज खरंतर ईंटरव्ह्यूसाठी आलेलोच नाही” संदीप म्हणाला “आजकाल टीव्ही बघणं करमणूक राहिली नसून टॉर्चर झालं आहे. तशी एका अर्थी करमणूकच आहे म्हणा. जनता कशी बेशिस्त वागते सांगताना मिडियाला स्वत:च्या वागण्याची शुद्धच राहिली नाहीये. भडकपणा म्हणजे पत्रकारीता असा समज झाला
आहे तुम्हा लोकांचा. सेंसॉर वर टीका करताना आपण बिभत्सपणा ब्रॉडकास्ट करत आहोत हे पण तुम्हाला समजू नये? मिडीया देव! बाकी फाल्तु. असां तुमचा गैरसमज झाला आहे. २४ तासाची चॅनल चालवण्याच्या नादात तुमची क्वालीटी एवढी घसरली आहे याचा तुम्हाला पत्ताच नाही. फिलर म्हणून सांस बहू और xyz असे
कार्यक्रम तुमच्या चॅनलवर प्रवेश करु लागले आहेत. सनसनी सारखे कार्यक्रम पाहून देशात चांगलं काही आहे की नाही? अशी शंका येते. काय वाईट होतं दूरदर्शन काही वर्षांपूर्वीचं? निदान फिल्म डायरेक्टर्स ना तरी ’एक्सपर्ट’ म्हणून बोलवत नसत तेथे. बॉम्बस्फोटाचा कट कुठे रचला याची तुम्हाला माहिती असते तर मग ते सरकारला कळवत का नाही? आपल्या देशाच्या intelligence एजन्सीज अकार्यक्षम असतीलही कदाचित, पण एवढया अकार्यक्षम की तुमच्यासारख्या विद्वान पत्रकारांना त्यांच्या आधी माहिती मिळावी?”
संदीप खुर्चीवरून उठत म्हणाला “सद्ध्या करतोय तो जॉब करायची मला हौस नव्हती, पण तुमच्यासारखी पत्रकारिता मला करायची नाहीये. आत्ता जे काम करतोय ते खरंच मला समाधान देतंय. अजून बरंच सांगायचं होतं, पण जाऊदे.”
चंद्रा स्तब्ध झाले होते. संदीप गेल्याचं त्यांना कळलंच नाही. त्यांनी रिसेप्शनिस्ट व एच आर ला बोलावून काही ईन्स्ट्रक्शन्स दिल्या व तातडीची बोर्ड मिटींग बोलवली.
आज अबतक चॅनल मधे बराच बदल घडला आहे. संदीप तेथेच सिनियर जर्नलिस्ट म्हणून काम करतो.
-किशोर
ईमेज रेफरन्स
http://oltsm.wordpress.com/2008/06/14/nadir-of-news-reporting/
http://www.advancedphotoshop.co.uk/users/1702/thm1024/job_interview.jpg
http://janeconstant.tripod.com/Interview.gif
http://images.askmen.com/better_man/keywords/job-interview_965823.jpg
http://www.coolfreeimages.net/images/angry/angry_02.jpg
http://ixwebhostwarning.files.wordpress.com/2008/12/shocked.jpg
