Monday, December 8, 2008

टेरिफिक ट्रॅफिक

पॅं पॅं SSS अशा आवाजाने कानठळ्या बसून माझी तंद्री तुटली. समोरचा सिग्नल हिरवा झाला होता. पुण्यातल्या ट्रॅफिकमधून थकून भागुन वाट काढत काढत लाल दिव्यापाशी आलो, की मला पंढरपूरला चालत जाताना वाटेत वडाच्या झाडाच्या सावलीत विसावा घेतोय असं वाटतं. मग संमोहित झाल्याप्रमाणे मी एकटक त्या लाल दिव्याकडे पहात राहतो. बाकी सर्व लोक तो दिवा हिरवा होण्याची चातकासारखी वाट पहात असतात. पण मला तिथून हलूच नये असं वाटत असतं.




तंद्री तुटताच मी पाहिलं की एक मोटारसायकलस्वार भरदाव वेगाने वाकडातिकडा वळत बाजूने निघून गेला. जाताना त्याच्या फटफटीच्या नळकांड्यातील धुराने मला ठेंगा दाखवत जोरात कानशिलात मारली. फटफटी किती योग्य नाव आहे नाही? प्रसंग तणावाचा होता, पण तरीही मला मॅनेजरने सांगितलेला विनोद आठवला.
तो असा: एकदा कर्वे रस्त्यावर एका माणसाला एक तरूण जोरात ओव्हरटेक करतो. नंतर हा माणूस त्याला पुढच्या सिग्नल वर गाठतो.
माणूस: का हो, तुमचं आडनाव कर्वे आहे का?
तरुण: नाही. का हो?
माणूस: मग बापाचा रस्ता असल्यासारखी का गाडी चालवताय?




असे प्रसंग पुण्यातच घडू शकतात. पण हा या लेखाचा विषय नाही. असो. पुण्यात बाहेरून आलेल्या लोकांचं स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी रिक्षावाले व ट्रॅफिक या दोन गोष्टींची सोय करून ठेवली आहे. पुण्यातलं ट्रॅफिक आहेच मुळी युनिक.




तुम्ही कधी फुटपाथवरून बाईक नेली आहे का? नाही? न्यायची असल्यास युनिवर्सिटीच्या सिग्नलवर पिक ट्रॅफिक असताना लगेच जा. कायदा मोडला जाऊ नये म्हणून गाडी चालवता चालवता आपलं फुट मधे मधे फुटपाथवर टेकवायचं मात्र विसरू नका, तेवढच गिल्टी फिलिंग कमी होईल. सिग्नल जवळ आला, की गाडीवरून उतरा, व गाडी बंद पडल्याचं भासवत थोडी ढकला. म्हणजे 'मामा' तुम्हाला काही करणार नाही. तसंही पोल्युशनमुळे बिचारे पोलिस आपलं मास्क धरून ठेवण्यातच गुंतलेले असतात. त्यामुळे पळून जाणंही फार अवघड नाही. तरीही, सिग्नलपाशी आल्यावर गाडी हळू करा व आजूबाजूला पोलिस आहे का पहा. नसेल तर सुसाट सुटा.





एका रस्त्यावर विविध रंगाच्या व आकाराच्या गाड्या पाहताना मला भारी मजा वाटते. आवाज करणाऱ्या बजाज RTZ, सामुराय सारख्या गाड्या, हिरवा ऑईल पेंट दिलेली एम ८०, पांढरा धूर सोडणारी स्कुटर, उन्हामुळे रंग विटलेली, पुर्वी लाल असलेली मारुती ८००, स्टेपनी लावलेली हिरवी स्कूटी अशा अनेक व्हरायटी इथे पहायला मिळतात. त्यावर स्वार होणारे लोकही तितकेच इंटरेस्टिंग असतात. इंद्रधनुच्या मुस्काटात मारेल इतकं रंगवैविध्य पुण्यातील रस्त्यावरच्या गाड्यांमधे असतं.





पुण्यातील लोक (पुरूष) अत्यंत रफ ड्रायविंग करतात असं येथील स्रियांचं देखिल मत आहे. पण ते खरं नाहीये. मुळात पुण्यातील या झाशीच्या राण्या (माझ्याकडे उगाच रागाने पाहू नका. सकाळ मधेच असे फोटो येतात - एक बाई मुलाला पाठीला बांधून कायनेटिकवर चालली आहे, खाली टायटल असतं - आधुनिक झाशीची राणी.) फार भयंकर गाडी चालवतात. मफलर चेहेऱ्याभोवती गुंडाळला की बहुदा माणसाला आपोआप अतिरेक सुचत असावा. चूक यांची असली तरी पुरुष बिचारे पडती बाजू घेतात. आणि या त्यांच्याकडेच रागाने बघत आपली काहीच चूक नाही असं दाखवतात. ब्रेक दाबण्याआधी दोन्ही पाय जवळजवळ जमिनिस टेकवतात व मगच ब्रेक दाबतात. (माझा एक मित्र म्हणतो की ते लॅंडिंगच्या वेळी विमानाची चाकं खाली आल्याप्रमाणे दिसते.)




सिग्नलवरचा रोजचा सीन - एक बस सिग्नलपाशी सर्वात पुढे उभी आहे. आजुबाजूला चिकटून टू व्हिलर्स नी तिला वेढलं आहे. सिग्नल सुटतो, २०० मिटर लांब असलेल्या दुचाकी पुढे जातात पण बसवाला बिचारा तिकडेच राहतो. मोठ्या खडकावर वाळू ओतली तर जशी वाळू आधी तळ गाठते, तसंच काहीसं सिग्नलचा टॉप व्ह्यू पाहिला तर दिसतं.




सायकलस्वारांना सिग्नलचं फार भय नसतं पण चढावर कोणी मधे आलं तर पुन्हा पहिल्यापासून पेडल मारणं हे मात्र त्यांच्यासाठी अवघड काम असतं. रिक्षावाले तर नियमांना वगरे भाव देत नाहीत (आणि पॅसेंजरलाही). पण रिक्षावाल्यांच्या बाबतीत माझ्या मनात विशेष प्रेम आहे. कारण एका जागी ३६० अंशात वळू शकणारं ते एकमेव वाहन आहे.




मी मात्र सिग्नल सुटला की असाच मागे असणाऱ्या गाडीवानांच्या शिव्या खात खात जागा होतो. तात्पुरता मनाला त्रास होतो, पण नंतर पुढचा प्रवास हेल्मेटच्या गॉगल ग्लासमधून ईकडे तिकडे बघत, पुढच्या ट्रक वरील '१३ मेरा ७ रहे', 'बुरी नजरवाले तेरा मुह काला', 'हॉर्न ओके प्लिज' च्या पाट्या पाहताना सुख देणारा असतो.




अजून बरंच काही लिहता येईल, पण काही गोष्टी या फक्त अनुभवायच्याच असतात.

3 टिप्पणी(ण्या):

Yawning Dog म्हणाले...

पण रिक्षावल्याच्या बाबतीत माझ्या मनात विशेष प्रेम आहे. कारण एका जागी ३६० अंशात वळू शकणारं ते एकमेव वाहन आहे.

he farach bharee !

प्राची म्हणाले...

faarach sahi observation ahe tuza

Bhagyashree म्हणाले...

सह्ही!! :))

विशेषतः गाडी बंद पडल्याची ऍक्टींग तर खूपच भारी! कधीना कधी तरी केलेलीच असते ही ऍक्टींग! :)