Thursday, April 24, 2008

विरोधाभास

पंत, सुरुवात करण्याआधी साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. रेडिओवरची निवेदिका पंत केळकर यांना म्हणाली. "धन्यवाद.. आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले." पंतांनी उत्तर दिलं.

"पंत, आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराविषयी आपण काही सांगाल का आमच्या प्रेक्षकांना?".

पंतांनी सांगायला सुरूवात केली... "हा पुरस्कार पाच वर्षातून एकदा साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याला देण्यात येतो. पैसे फार मिळत नाहीत, पण हा अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. नुसतीच पुस्तकं किंवा लेख लिहून चालत नाही, तर काहीतरी नावीन्य असावं लागतं तुमच्या कामात.. म्हणजे, जसं पीएचडी मिळवण्यासाठी उल्लेखनीय काम करावं लागतं तसंच काहीसं."


"अच्छा! म्हणजे, काहीतरी चौकटी बाहेरचं काम?" निवेदिका म्हणाली, "आपल्या योगदाना विषयी काही सांगा ना.."

"माझ्या पुस्तकांतून आणि लेखातून मी एक नवीन शैली रसिकांसमोर आणली आहे. विरोधाभास हे तिचं नाव. थोडक्यात, लिहायचं एक आणि म्हणायचं काही वेगळंच. म्हणजे बोले तैसा चाले च्या एकदम विरूद्ध!"

"पण असं लेखन करणं अत्यंत अवघड समजलं जातं लेखकांच्या वर्तुळात; आपण तर हे लिलया करता! नक्कीच आपल्याला दैवी देणगी वगरे असावी. आम्हाला जरा सांगा ना यामागचं रहस्य.."

"खरं सांगायचं तर रहस्य वगरे काही नाही त्यात. अहो, सभोवतालचं जग जरा नीट निरखून पाहिलं म्हणजे विरोधाभासच दिसेल सगळीकडे. तेच उतरवायचं आपल्या शाईमधून!" पंतांनी सांगायला सुरूवात केली.....


विरोधाभासयुक्त लेखनात मी तरबेज होण्यामागे सर्वात मोठा (सिंहाचा) वाटा शाळेत शिक्षण घेत असताना मिळालेल्या अनुभवांचा आहे. एकूणच आपली शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम, कायदे आणि नेत्यांचे वायदे यांतील त्रुटींमधून खूप काही शिकायला मिळालं. जे शिकवलं गेलं आणि जे प्रत्यक्ष अनुभवलं/ मनाला पटलं त्यात जमिनआस्मानाचा फरक होता.

माझा जन्म जुलै महिन्यात एका प्रामाणिक सरकारी नोकराच्या घरात झाला. वडिल प्रामाणिक असल्याने सहाजिकच घरातील परिस्थिती फार काही आकर्षक नव्हती. त्यामुळे माझं शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झालं. वडिल प्रामाणिक असल्याचा आजपर्यंत मला प्रचंड अभिमान होता. पण एकदा एका मित्राने प्रश्न विचारला, तु ८३ सालचा असून दहावीला ९८ साली कसा बसलास? थोडी चौकशी केल्यावर उलगडा झाला - माझा जन्मदाखला बदलून वडिलांनी माझा जन्म जून मधे असल्याचं दाखवलं होतं! त्यातच नवीन कळलं की शाळेत मला प्रवेश भरमसाठ डोनेशन देऊन मिळाला होता! अशाप्रकारे माझ्या शिक्षणाची सुरूवातच वाजत गाजत झाली.


पहिल्या दिवशी शाळेत जाताना रडलो खरा, पण चौथी पर्यंत खरं तर शाळेत न आवडण्यासारखं काही नव्हतं. दोन तास घसरगुंडी, झोपाळे खेळून पुढच्या यत्तेत जाणं आता शक्य आहे का मला सांगा. तेव्हा विषय पण काय काय सुदर असायचे! शिवाजी महाराजांच्या गोष्टी, सोपी गणिते, कळतील अशा कविता... तेव्हा एका विषयाचं नावच इतिहास व छान छान गोष्टी असं होतं! पण आयुष्यातील ते सोनेरी दिवस फार काळ टिकले नाहीत. "मोठ्या" शाळेत गेल्या नंतर असे एक एक विषय मागे लागले, की आमचं धाबं दणाणलं.


चौथीपर्यंतचा इतिहास आणि त्यानंतरचा इतिहास यामधे जमीन आसमानाचा फरक होता. आता धड्यातून गोष्टी केव्हाच निघून गेल्या होत्या. त्यांच्या जागी आता सनावळ्यांना महत्व प्राप्त झालं होतं. पुस्तकात कोणते धडे असावेत हे ठरवणारे जाणकार मला बघायचे आहेत. धड्यांचा क्रम कोण ठरवतं हे मला अजूनही कळलेलं नाहीये. धडा पहिला : फ़्रेंच राज्यक्रांती, धडा दूसरा: भारतीय क्रांतिकारक, आणि धडा तिसरा: चले जाओ चळवळ?? अशा प्रकारे क्रांती आणि शांती यांच्यात डोक्यामधे जागा मिळवण्याकरीता संगीत खुर्चीचा खेळ व्हायचा. खरं सांगू का? आम्हाला सगळ्यांना रॅन्ड चा वध, संसदेतील बॉम्ब हल्ला अशा गोष्टीत मनापासून रस असायचा. त्या गोष्टी ऐकून आपणही लढ्यात सामील व्हावं असं वाटायचं. मला तर वर्गातील सदाशिव व मी साहेबाच्या हत्येच्या आरोपाखाली फासावर लटकलो आहे असं स्वप्न देखिल पडलं होतं. पण बाईंच्या मते अहिंसेचाच मार्ग जास्त गुण मिळवून देणारा होता त्याला आम्ही तरी काय करणार. (अहिंसेचा मार्ग असेलही चांगला कदाचित, पण ते एका गालावर थोबाडीत मारण्याचं उदाहरण चूकीचं आहे असं माझं ठाम मत आहे. दुसरं उदाहरण वापरलं असतं तर अहिंसेच्या अर्जाचा विचार तरी केला असता. मार्केटींग मधे चरखावाले कमी पडले असावेत)


इतिहासाच्या बरोबरीने येणारा विषय भूगोल. नद्या, पर्यावरण, पर्वतरांगा, हवामान, जमिन ते जलावरण, वातावरण इत्यादि महत्वाच्या विषयांना हात घालणारा हा विषय. पण नदी पहायला आम्हाला पुण्याच्या बाहेर जावं लागे. पर्वत वगरे जवळपास नाहीत. नळस्टॉपचा सिग्नल वातावरणाचे धडे घेण्यासाठी अगदी अयोग्य. टेकड्या साफ केल्याने बिल्डर लॉबीचा फायदा होतो एवढे टेकड्यांबद्दलचे आमचे माफक ज्ञान! कुठल्याही प्रकारचे वारे शहरात पंखा लावल्याशिवाय हलत नाहीत. निसर्ग हा गॅलरीतील कुंडीपुरताच मर्यादित. बरं, गावातल्या रस्त्यात हरवणारे आम्ही जगाचा नकाशा काय पाठ करणार? पण ध्वनी/वायू/जल प्रदूषण या विषयांमधे आमचा हात कोणीही धरला नाही हे ही तितकंच खरं. भूगोलात गोल मिळायला एवढी कारणे पुरेशी होती.

नागरीकशास्त्र हा विषय आवडणारा एक विध्यार्थी मला कोणीही दाखवावा! याचा कार्यकाल किती? त्या पदासाठी वयाची अट काय? असल्या गोष्टी लक्षात ठेवता ठेवता नाकी नऊ आले होते. सगळ्यांना २५ वयानंतर ५ वर्षे काम करू द्यावं. असे केल्यास या विषयाची गरजच भासणार नाही. आणि आपोआपच दप्तराचं ओझं कमी होईल एका पुस्तकानी (सरांना सांगू नका, पण एका गाईडने सुद्धा!)

अर्थशास्त्र हा असाच एक विषय. पैसा कसा कमवायचा हे या विषयातून शिकायचं आणि पुढच्या मराठीच्या तासाला "बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा", "माणसाला साडेतीन हात जागा पुरते" असले धडे घ्यायचे. "मराठी माणूस धंद्यात का मागे पडतो?" यामागचा आमचा तर्क याच उदाहरणावर आधारीत आहे. (पुणेकर या नात्याने मत मांडणं हा आमचा अधिकारच आहे.)

भाषेचे विषय बहुदा कोणालाच आवडत नाहीत. रामायण, महाभारत बघून आपल्याला हिंदी येतं असा फाजील आत्मविश्वास वाढीस लागतो. प्रत्यक्षात 'मै तेरेकु बाण मारेगा' याहून चांगल्या वाक्यरचना करायला जमत नाहीत. इंग्रजी बोलताना सुद्धा भले भले 'ना', 'रे', 'अरे' असे शब्द वापरतात. उदा. Person1: Hey let's go na!Person2: Are no re.


मराठी या विषयाबद्दल काय बोलु? आपल्याच मातृभाषेत एवढे कमी गुण मिळण्यासारखं अपमानास्पद दुसरं काही नाही. मराठी विषयामधे अनेक उत्कृष्ट धडे व कविता असत. पण धडे व कवितांची संख्या ५० च्या आसपास जात असे. आणि मग हा धडा कोणी लिहिला, ही कविता कोणाची, संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या, असल्या प्रश्नांमुळे चांगले चांगले धडे पण भीतीदायक वाटायला लागत. बरं, या साहित्यकारांना टोपणनावे ठेवण्याची भारी हौस. त्यामुळे मग सगळे लेखक कवी पाठ करूनही जोड्या जुळवताना (पेपरमधे बरं का! तुम्हाला काय वाटलं?) चांगलीच पंचाईत व्हायची. आमच्या बाई पु.लं च्या उपासासारख्या धड्यावर लक्ष केंद्रीत न करता काहीही अर्थ न लागणाऱ्या कवितांचा कवी काय म्हणतो यावरच भर द्यायच्या. कवी काय, लिहतो काही वाट्टेल ते. ज्याचा त्याने अर्थ घ्यावा. या बाईंना सगळे कवी स्वप्नात येऊन त्यांना कवितेत काय म्हणायचं आहे हे सांगत असावेत. मराठी विषयावरून मला एक प्रसंग आठवतो. दहावीच्या शेवटी बाहेरून एक शिक्षक आम्हाला मराठी शिकवायला आले होते. ते आम्हाला निबंध कसा लिहावा हे सांगत होते. "पुस्तकातून पाठ करुन निबंध कोणीही लिहील. तुम्ही काहीतरी नावीन्यपुर्ण लिहायला हवं. उदा. 'आई' या विषयावर निबंध लिहीताना पुढील वाक्य निबंध परिणामकारक बनवेल. 'आई पोळ्या करत होती. मला गरम पोळी मिळावी म्हणून तिने तव्यावरुन पोळी हातनेच घाईत उचलली.. अशी असते आईची माया!' " बसं. मला हे वाक्य मनापासुन आवडलं. ते मी चाचणी परिक्षेत वापरलं देखील. पण पेपर हातात आल्यावर निबंधात ५/१५! नंतर कळलं की पेपराच्या आदल्या दिवशी १५ ते २० मुलांच्या आयांचे हात पोळी करताना भाजले होते......

विज्ञान आणि गणिताविषयी मला पुढील वाक्य सांगावसं वाटतं. "". झालं सांगून.

मामाच्या गावाला आनंदाने जायला कवीच असावं लागतं. सुट्टीत गृहपाठ करणाऱ्यांना नाही जमत ते. गाणं काही जन्मजात चांगलं येत नाही, पण घरी मुक्तपणे गावं म्हटलं तर वडीलधाऱ्यांची झोपमोड होते. समुहगीतात भाग घेणारे नेहेमीच हास्याचा विषय असतात. शारिरीक शिक्षणाची कितीही आवड असली तरी 'अ' मधील मुलं 'क' मधील मुलांशी (नव्हे पुरुषांशी) कबड्डीत कधीच जिंकू शकत नाहीत. शौर्याच्या गोष्टी तुसत्या ऐकायच्या वा डिस्कवरी चॅनलवर पहायच्या असतात. प्रत्यक्षात ४-५ की.मी. पेक्षा जास्त अंतर आया मुलांना सायकल वरून कापू देत नाहीत. प्रामाणिकपणा, सत्य इत्यादी गुणांना देवासमान मानतात कारण देवाप्रमाणेच ते जगात कुठेही दिसत नाहीत.

थोडक्यात काय, तर शाळेतील अभ्यासक्रमामुळे आमचं बालपण कोमेजलं. ज्या गोष्टींनी घडवावं त्यानीबी-घडवलं. पंचवीशी उलटल्यावर उमगल की 'वाचलं सगळं होतं पण येत काहीच नव्हतं.'

केवढा हा विरोधाभास!
पंत बोलायचे थांबले, पण एव्हाना निवेदिका पांढरी पडली होती....

12 टिप्पणी(ण्या):

Circuit म्हणाले...

Are mast jamala aahe...Title pan yogyach aahe...Shuddha marathit hya prakarala bahutek "Irony" mhanatat. Tyala marathit pan kahitari nav aahe... pan mala aathavat nahi....kevadhi mothi "Irony" na

Bhagyashree म्हणाले...

ए सही लिहीलयंस!! हेहे.. शाळा आठवली एकदम..

Audumbar म्हणाले...

apratim! zhakkas lihilay!!
It reminded me of the phrase-
"I was born Intelligent, but education ruined me" !!

Onkar म्हणाले...

Kishor

1 no lihiles. Barach vel ahe disatoy. Shaletale sagale athavale. Best part is sagale vyavastit rachale pan Shistivar lihayache visaralas ;)


Chal bye asach lihit ja and pathavat ja

anupgetspersonal म्हणाले...

ek no. re.kuthun copy paste kelaies??
;)
nways..asach jamla tar apaya vargatlya gamti-jamti var lihi na..

Pankaj म्हणाले...

arey best...dahavi diwali ankatle nibandha ratta marlele aathavle...marathi ek ashakya vishay hota...sandarbhasahit spashtikaran kara chya aiwaji "guide madhun paath kelele liha" asa prashna jasta yogya asta...kavita na wachta navneet madhla arthantar goshta wachlya sarkha wachun jaycha...same applies to english...kadhi english madhe dhade wachlele aathvat nahi...fakta bhashantar wachayche...parikshe madhe marathi madhe wakya banvaychi aani jamel tevdha english madhe bhashantar karun paper chirkhavaycha...

vidhnyan aani ganit ya vishaynshi mala kharakhura prem hota...thankfully ajunahi aahe...

aani nagrikshastra aawadnara "mich" to.

chitrakala rahunach gela :P kale-vina chitra mhanje chitrakala. Kamble saranchya shivya aani Rajput saranchya bukkya ajunahi aathavtat.

ashich goshta mi kahi varshanni MS aani Thesis baddal lihinar !

Nikhil म्हणाले...

khup sahi aahe..........
pan he achanak kas kay ?
i jus recollect all those days man........
amazing.......
pan mala sang......
he achanak kas kay?

Nachiket म्हणाले...

'मै तेरेकु बाण मारेगा' !!! Awessomme!

Nagrikshastra tevdha kahi vaeet navata...mala te aavdayacha karan tyacha saglyat kahan pustak asayacha ;)

Hrushikesh Gandhi म्हणाले...

"it is so good no yaar"
"you are mhanje too much baraka"
awadlay...khup sundar...ani direct..marmik ki asa kahitari amchya bai mhanaycha (amcha bolnyakade laksha nase pan tari!)
Keep going..jamlay tula!!

Bhagyashree म्हणाले...

किशोर, तुला ’आवडलेल्या कवितांचा’ खो दिला आहे.. http://bhagyashreee.blogspot.com/2008/09/blog-post.html

लिही काहीतरी लवकरच! :)

Bhagyashree म्हणाले...

अरे म्हणजे,तुला आवडलेल्या २ कविता तू लिही..कितीही चालतील तश्या.. आणि लिहून झालं की अजुन कुणाला तरी खो द्यायचा.. म्हणजे त्यानी पण लिहायचं.. असं.. http://samvedg.blogspot.com/2008/08/blog-post_20.html
याने हा खो सुरू केलाय..

Mandy म्हणाले...

Ek number!!! Lai byest!! Maaaz...!! Jhyaak!! Ajun changle shabdaa suchat nahiyet! :P
Sagale blogs atishay sunder jamle ahet! navin kahin lihlaas kee nakki kalav! :)