रविवार १३ सप्टेंबर २००९

नेता

 

मी एक नेता आहे, मला राजकारण करायचंय,
पण कुठल्या पक्षातर्फे? तेवढं अजून ठरायचंय!

जेव्हा विचारत नव्हतं कुत्रं, तेव्हा भेटले पक्षातले मित्र,
हताश तरुणांना ऐशोआरामाचं गाजर - हे आमचं पक्षवाढीचं सूत्र,
सूत्र हे हुशारीने वापरत दिल्लीतील कुरणात चरायचंय,
पण कुठल्या पक्षातर्फे? तेवढं अजून ठरायचंय!

फसवणूक-खुन-हाणामाऱ्या हे तर ओघाने आलंच,
जमिनी आल्या गाड्या आल्या, क्रिमिनल रेकॉर्डही झालंच,
घाणीत उडी घेतलीय खरी, पण ’क्लीन’च बाहेर पडायचंय,
पण कुठल्या पक्षातर्फे? तेवढं अजून ठरायचंय!

अस्तित्व दाखवण्यासाठी शक्तीप्रदर्शन त्यात विशेष महत्व झेंड्याचं,
लोक शिव्या देउन थकले - शेवटी कातडं आपलं गेंड्याचं,
सत्तेसाठी वेळ आली तर सख्ख्या भावाशीही भांडायचंय,
पण कुठल्या पक्षातर्फे? हे गणित अजून मांडायचंय!

राजकारणातील प्रत्येक व्यक्ती, उतारवयात एकटी रडते,
विश्वासू लोकच उलटतात, गेम आपल्यावरच उलटी पडते.
स्वर्गाची तर अपेक्षाच नाही, नरकात तरी चेहरा लपेल काय?
चांगलं वागण्याचं दिलेलं ’आश्वासन’, तिकडे तरी खपेल काय?
कोणीच व्यथा ऐकत नाही, हे दु:ख तुम्हाला सांगायचंय,
पण मी नक्की कोणत्या पक्षाचा? हे गणित अजूनही मांडायचंय.

किशोर दातार (९/१३/२००९)